अतिक्रमणधारकांना मनपा, पोलिस प्रशासनाचाच आशीर्वाद; फुटपाथवरील कारवाईचा नुसताच दिखावा

Foto

औरंगाबाद: शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महानुगरपालिकेची आहे. तेवढीच जबाबदारी स्थानिक पोलिसांची आहे. पण या समस्येकडे दोन्ही प्रशासनाकडून थातून-मातूर कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. 

औरंगाबाद शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरातील रस्त्याचे डी.पी. प्लॅननुसार रस्ते बांधणी केलेली नाही. डी.पी. प्लॅननुसार जर रस्ते निर्माण केले तर वाहतूक कोंडीला मोठी मदत होऊ शकते. पण मनपा प्रशासन डी.पी.रोडकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक डी.पी. रोडवर नागरिकांनी पक्की घरे आणि दुकाने बांधली आहेत. ही सर्व अनधिकृत आहेत. अनधिकृत अतिक्रमणे पाडण्याचा अधिकार हा मनपाचा आहे. पण मनपा प्रशासनाकडून या अतिक्रमणावर कुणीतरी तक्रार दिली तर थातूरमातूर कारवाई केली जाते. आठ दिवसानंतर ही अतिक्रमणे पुन्हा पूर्वीसारखी थाटली जातात. मनपाने जे डी.पी. रोड तयार केले आहेत. त्या रोडच्या फुटपाथवरही मोठ्या प्रमाणात छोटे व्यावसाय केले जातात. या अतिक्रमणामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण जाते. फूटपाथवर चहाच्या टपर्‍या, पान टपरी, फळांची, भाजीपाल्यांची दुकाने, किरकोळ वस्तूंच्या विक्रीची दुकाने, गॅरेज थाटलेली आहेत. या छोट्या दुकानात येणार्‍या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. विशेषतः मुख्य रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आज शहरातील वाहनांची संख्या जवळपास 15 लाखांच्या वर पोहचली आहे. याशिवाय चार ते पाच लाख वाहने अन्य शहरातून शहरात येणे-जाणे करतात. त्यामुळे बीड बायपास रोड, सिडको बस स्टॅण्ड ते जळगाव रोड, बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा रोड, नगर रोडवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रोडवरील अतिक्रमणे काढली तर वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक मार्ग, क्रांतीचौक ते गुलमंडी मार्ग, शहागंज रोड, सिटीचौक, गजानन मंदिर, पुंडलिकनगर रोड, गारखेडा चौक, सिडको, हडकोतील मुख्य रस्ते, मुकुंपदवाडी, चिकलठाणा, हर्सूलगाव, रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथ यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणाचा त्रास वाहनधारकांसह पादचार्‍यांना ही होतो आहे.  त्या त्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि मनपाच्या झोन कार्यालयातील अधिकार्‍यांनी त्यांच्या परिसरातील अतिक्रमणे हटविली तरी वाहतूक कोंडी सुटू शकते.